अग्रलेख

कशी रोखणार भाजपाची गती?

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीवरच नव्हे, तर या आघाडीतील घटक पक्षांवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत उत्साहाचे वातावरण आहे. विरोधक संपल्यात जमा असल्याचे चित्र काढण्यास भाजपाने सुरुवात केली आहे. भाजपाचा यशस्वीपणे मुकाबला करायचा असेल, तर विरोधकांना आपसांतील मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत. भाजपाकडून चाणक्य नीतीचा वापर केला जातो, हे विरोधकांच्या लक्षात येत नाही, असे काही नाही. मात्र, विरोधकांनी नवीन रणनीती आखली तरच भाजपाचा यशस्वीपणे मुकाबला करता येऊ शकतो. पाच राज्यांपैकी तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील निकालांतून जो संदेश आला आहे, तो विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे, असा आहे. पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षांपासून आपली सत्ता असून, आपल्याला कोणताही धोका नाही, असा समज तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी करून घेतला होता. दुसरीकडे, आपली सत्ता उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपा घुसखोरी करत असून, नवनवीन रणनीती आखत आहे, याचा अंदाज ममता बॅनर्जी यांना आला नाही. भाजपाच्या प्रत्येक खेळीला त्यांनी शह दिला नाही. बॅनर्जी यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पश्चिम बंगालमधील लाल किल्ला ज्या आक्रमक पद्धतीने उद्ध्वस्त केला, त्याच आक्रमक पद्धतीने भाजपाने ममतांचा गड उद्ध्वस्त केला. ममतांच्या तृणमूल काँग्रेसशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा हिंसक संघर्ष होत होता. तसाच संघर्ष सत्तेत असलेल्या तृणमूलचा भाजपाशी होत होता. भाजपाने तृणमूलचीच रणनीती अंगीकारून प. बंगालचा किल्ला सर केला. आता या राज्यात भाजपाचे सरकार स्थापन झाल्यावर तृणमूल काँग्रेसला विरोधात बसावे लागणार आहे. मात्र, रस्त्यावरची लढाई करावी लागणार आहे. प. बंगालमध्ये यात त्यांना काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आम जनता उन्नती पार्टी या पक्षांची कितपत साथ लाभेल, हा प्रश्न आहे. इंडिया आघाडीत मार्क्सवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा समावेश असला, तरी त्यांचे तृणमूल काँग्रेसशी टोकाचे मतभेद आहेत. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडून हुमायून कबीर यांनी आम जनता उन्नती पक्ष स्थापन केला असून, हा पक्ष भाजपाविरोधी आहे. विरोधी पक्ष एकवटले तरच ते भाजपाचा मुकाबला करू शकतील. भाजपाने प. बंगाल ताब्यात घेतला आहे. त्यावर मजबूत पकड बसविण्याची रणनीती भाजपा आखेल. भाजपाच्या ताब्यातून या राज्याची सुटका करण्याची क्षमता आजमितीस कोणत्याही पक्षाकडे नसली, तरी विरोधी पक्ष म्हणून तृणमूल काँग्रेसला नवीन रणनीती आखावी लागेल. तामिळनाडूत सत्तारूढ द्रमुकसमोर अण्णा द्रमुक-भाजपा युतीचे म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे कडवे आव्हान नव्हते. आपल्या सत्तेला कोणताही धोका नाही, असा समज द्रमुकचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांनी करून घेतला होता; परंतु त्यांनी तमीळ सुपरस्टार थलपती विजय याच्या लोकप्रियतेकडे दुर्लक्ष केले. त्यांनी स्थापन केलेल्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) या नव्या पक्षाच्या मागे लोक असल्याचे एका घटनेतून सिद्ध झाले होते. दि. 27 सप्टेंबर 2025 रोजी तामिळनाडूतील करूर-इरोड महामार्गावरील वेल्सामीपुरम येथील मैदानात चेंगराचेंगरी झाली होती. यात 60 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी स्टॅलिन सरकारने मदत व बचावकार्य केले होते. पण नंतर विजय यांच्या लोकप्रियतेची दखल घेतली नाही. तामिळनाडूत सुपरस्टार्सवर लोक जीव ओवाळून टाकतात, हे माहीत असूनही द्रमुकसह कोणत्याही पक्षाने विजय यांची दखल घेतली नाही. द्रमुकच्या नेतृत्वाखालील पुरोगामी लोकशाही आघाडीत असूनही काँग्रेसने विजय यांच्या पक्षाशी जागावाटप बोलणी केली होती. याचा अर्थ विजय यांच्या ताकदीचा काँग्रेसला अंदाज आला होता. तामिळनाडूच्या कुशीत असलेल्या केंद्रशासित पुद्दुचेरी या प्रदेशातही द्रमुकला ऑल इंडिया एन. आर. काँग्रेस-भाजपा युती किंवा राष्ट्रीय लोकशाही सत्तेत असल्याच्या ताकदीचा अंदाज आला नाही. तामिळनाडूत थलपती विजय मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. ते काँग्रेस आणि इतर लहान पक्ष व अपक्षांचा पाठिंबा मिळवू शकतात. पुद्दुचेरीतही त्यांच्या पक्षाला दोन जागा मिळाल्या. तामिळनाडूत भाजपाला एकही जागा मिळाली नाही. मात्र, पुद्दुचेरीत चार जागा मिळाल्या आहेत. प. बंगाल, आसाम, ओडिशा या राज्यांत जशी सत्ता मिळवली, तशी सत्ता भाजपाला हळूहळू मिळवायची आहे. याचा विचार काँग्रेस, द्रमुक आणि इतर पक्षांनी केला पाहिजे. तामिळनाडूत इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये मतभेद नसले, तरी यापुढे एकत्रित व्यूहरचना आखली, तरच भाजपाला रोखता येऊ शकेल. आसाममध्ये इंडिया आघाडीत काँग्रेस सोडून एकही मोठा पक्ष नाही. भाजपाशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसला नवीन रणनीती आखावी लागेल. केरळममध्ये दोन आघाड्यांचे राजकारण असून, तेथे भाजपाचे स्थान नगण्य आहे. मात्र, इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्यात टोकाचा संघर्ष आहे. त्यात लहानलहान पक्षसंघटनांना हाताशी धरून हातपाय पसरण्याचा भाजपाचा प्रयत्न आहेच. आणखी तीन वर्षांनी म्हणजे 2029 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकांचा विचार करता भाजपाचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. विरोधातील इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये पराकोटीचे मतभेद आहेत. ते बाजूला ठेवले, तरच भाजपाला चांगली टक्कर देता येईल. भाजपाला रोखणे सोपे नाही, हाच संदेश पाच राज्यांतील विशेषतः पश्चिम बंगाल आणि आसाममधील निकाल देत आहे. विरोधकांनी आपसांतील मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे, हा एक संदेशही मतदारांनी दिला आहे. भाजपाची गती कशी रोखायची, हाच विरोधकांसमोेर प्रश्न आहे.

How to stop the BJP’s momentum?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नॉन क्रिमीलेअर मर्यादा पंधरा लाख

ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय, 43 नव्या जातींच्या समावेशाचा प्रस्ताव मुंबई : राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक…

4 minutes ago

मोटेगावकरच्या मुलासह विद्यार्थी, पालक रडारवर

नीट पेपरफुटी प्रकरण; सीबीआयकडून झाडाझडती मुंबई : नीट पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी…

20 minutes ago

काटकसर-पर्व

पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…

22 hours ago

माय मराठीसह बोलीभाषांचा जागर; आगळावेगळा पुस्तक प्रकाशन सोहळा

माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध,…

22 hours ago

समाजाची अधोगती…

गेल्या आठवड्यात नातेवाइकाच्या लग्नाला गेलो होतो. खरेतर लग्न कसले, फक्त वैताग. जावे लागते म्हणून लोक…

22 hours ago

मनमाड एसटी आगारात प्रवाशाची अडवणूक

सवलत पाससाठी जादा पैसे उकळल्याचा ज्येष्ठ नागरिकाचा आरोप मनमाड : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या…

22 hours ago