अग्रलेख

गर्जा महाराष्ट्र माझा.. कामगार आहे मी…

एक मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, त्याआधी एक मे पासून आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 66 वर्षे पूर्ण होत आहेत, तर आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचा इतिहास 137 वर्षांचा आहे. मराठी माणसांची अस्मिता म्हणून महाराष्ट्र दिनाला आणि कामगारांची अस्मिता म्हणून कामगार दिनाला महत्त्व आहे. कामगार दिनाची पाळेमुळे रुजविणारा अमेरिका आज जगातील सर्वांत प्रगत देश आहे. देशातील सर्वांत प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. आपल्या हक्कांसाठी कामगारांना शहीद व्हावे लागले. मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना व्हावी म्हणून मराठी माणसांनाही रक्त सांडवावे लागले. दोन्ही दिनांना एक रक्तरंजित इतिहास आहे. कामगार म्हणजे मजूर किंवा अंगमेहनतीचे काम करणारा माणूस, अशी पूर्वीची व्याख्या होती. आता बौद्धिक आणि तांत्रिक आणि शारीरिक श्रम करणारा कामगार, अशी एक व्याख्या झाली आहे. या व्याख्येत मोडणार्‍या श्रमिकांवर बेरोजगार होण्याची वेळ येऊ लागली आहे. जगभरातील अनेक कंपन्यांनी श्रमिक कपातीचे धोरण अंगीकारले असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे कंत्राटी, आउटसोर्सिंग कामे करवून घेतली जात आहेत. भारतात नवीन कामगार कायदे लागू करण्यात आले आहेत. ते कामगार हिताचे असल्याचा दावा सरकार करत असले, तरी अनेक कामगार संघटनांचा या कायद्यांना विरोध आहे. संप करणे हे श्रमिकांचे हत्यार असले, तरी ते बोथट झाले आहेत. महाराष्ट्रात एसटी कर्मचार्‍यांनी केलेल्या संपाचा बोजवारा उडाला होता, तर राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी नुकताच संप पुकारला होता. आश्वासनानंतर संप मागे घेण्यात आला. राज्यात मराठी माणूस म्हणून शेतकरी, शेतमजूर, कामगार यांची स्थिती फार चांगली नाही. मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न घेऊन उदयास आलेल्या संघटना राजकारणात मश्गुल झाल्या आहेत. परप्रांतीयांची मते आणि धार्मिक राजकारण यामुळे मराठी माणूस दुर्लक्षित होऊ लागला आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
मुंबई एक शान
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी ताकदीनिशी एकवटलेल्या मराठी जनतेला कवी आणि शाहिरांनी शक्ती दिली. मुंबईसाठी 106 मराठी माणसे शहीद झाली म्हणून मुंबई आज महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र हा देशाचा एक मानबिंदू आहे. मुंबई ही महाराष्ट्राचीच नव्हे, तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून शान आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात किंवा महाराष्ट्राबाहेर, जगाच्या कानाकोपर्‍यात राहणारा मराठी माणूस जिवाची मुंबई करत असतो किंवा जिवाची मुंबई करायला आसुसलेला असतो. अशी ही मुंबई म्हणजे महाराष्ट्राचा जीव की प्राण! मुंबईवरच महाराष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कवी राजा बढे यांचे, ‘जय-जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत आजही प्रेरणादायी ठरत आहे. या गीतातील “काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी”
या ओळी नेहमीच प्रेरणा देतात. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हेच शब्द आज आपल्या एकजुटीसाठी महत्त्वाचे आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते. त्याचवेळी भाषावार प्रांतरचनेची मागणी जोर धरू लागली. गुजराती भाषिकांना स्वत:चे वेगळे राज्य हवे होते. त्याचवेळी मराठी भाषिक नागरिकही स्वतंत्र राज्याची मागणी करत होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारल्याने मराठी माणसे चिडली होती. 21 नोव्हेंबर 1956 रोजी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. प्रचंड मोर्चा आला. मोर्चा उधळून लावण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करूनही उपयोग झाला नाही म्हणून पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी दिला. यात 106 जण शहीद झाले. यात अनेक कामगार होते. शेवटी मराठी माणसांची मागणी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मान्य करावी लागली. दि.25 एप्रिल 1960 रोजी संसदेने केलेल्या मुंबई पुनर्रचना कायदा 1960 नुसार महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन स्वतंत्र राज्ये एक मे 1960 रोजी अस्तित्वात आली. मराठी माणसांची मुंबई आज बहुभाषिक झाली आहे. मुंबईचे आंतरराष्ट्रीय महत्त्व कमी करण्याचा प्रयत्नही होत आहे. मुंबई केंद्रशासित करण्याची आवई मध्येच कधीतरी उठवून दिली जात असते. महाराष्ट्राला डावलण्याचाही प्रयत्न होत आहे. हे वारंवार दिसून येत आहे. दाक्षिणात्य, उत्तरेकडील राज्यांतील प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांचे नेते आपल्या राज्याचे हित जोपासण्यासाठी मतभेद बाजूला ठेवतात. महाराष्ट्रात कसे काही दिसत नाही. महाराष्ट्र सदैव पुढे असावा, हे मराठी माणसाला नेहमीच वाटत आले आहे. त्याला राजकीय इच्छाशक्तीची जोड असली पाहिजे.
तळपती तलवार
कामगारांना दिवसाकाठी आठ तासच काम असावे, या मागणीसाठी अमेरिकेतील शिकागो येथील कामगारांनी 1 मे 1886 रोजी निदर्शने केली. नंतर चार मे रोजी मोठा हिंसाचार झाला. त्यात कामगारांचे बळी गेले. पुढे कामगारांच्या प्रश्नांवर आंतरराष्ट्रीय परिषदा झाल्या. सन 1889 मध्ये पॅरिस येथे झालेल्या परिषदेत शिकागोतील कामगारांच्या लढ्याचे स्मरण म्हणून यापुढे 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिला कामगार दिन 1990 मध्ये आला, तरीही अमेरिकेत 1916 पर्यंत कामगारांच्या कामाचे दिवसाकाठी आठ तास करण्यात आलेले नव्हते. जगातील कामगारांनी संघटित होऊन आपली मागणी पदरात पाडून घेतली. भारतात 1923 मध्ये प्रथम कम्युनिस्टांनी कामगार दिन पाळला. त्यानंतर अनेक कामगार आणि कर्मचारी संघटना हा दिन पाळू लागल्या. आठ तास मनोरंजनासाठी आणि आठ तास विश्रांतीसाठी पाहिजे, या उद्देशाने कामगारांनी आंदोलन केले होते. हा उद्देश धुळीस गेला आहे. आज संघटित कामगारांना लाभ मिळत असले तरी कंत्राटी आणि असंघटित कामगार आणि मजूर दिवसाकाठी 12-12 तास काम करतात. गरज म्हणून आणि रोजीरोटीसाठी त्यांनी ते स्वीकारले आहे. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या,
‘कामगार आहे, मी तळपती तलवार आहे’ या कवितेतील,
“कामगार आहे मी, तळपती तलवार आहे…
रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे
कधी फाटकाबाहेर, कधी फाटका आत आहे
सारस्वतांनो, थोडासा गुन्हा करणार आहे”
या ओळी कामगारांना त्यांच्या ताकदीची जाणीव करून देणार्‍या असल्या, तरी आज कामगार हतबल आहेत.

My dear Maharashtra.. I am a worker…

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

18 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

18 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

18 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

18 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

18 hours ago